पर्यावरण सेवा योजना (Environment Service Scheme (ESS)) माझी वसुंधरा अभियान ५.०

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन, पर्यावरण सेवा योजना (ESS) संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येत आहे. यांमध्ये महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत तसेच ग्रामपंचायत हद्दीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शासन मान्य शाळा स्वेच्छेने ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवू शकता.योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, यशस्विता, लक्षप्राप्ती लक्षात घेता माननीय (वित्त) मंत्री महोदय यांनी सन २०२३ रोजीच्या अर्थसंकल्पिय भाषणामध्ये पर्यावरण सेवा योजना राज्यभरातील ७५०० शाळांमध्ये राबविण्याची घोषणा केली होती. ही योजना पूर्ण राज्यभरात लागू असून योजनेचा दुसरा टप्पा म्हणून आगामी पाच वर्षात राज्यभरातील ७५०० शाळांमध्ये योजना राबविण्यात येईल. 

या उपक्रमाचे उद्दिष्ट शहरी व ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जागतिक तापमान वाढ, हवामान बदल यांचे परिणाम कमी करण्याच्या उपाययोजना व कृती कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे हा आहे. शालेय स्तरावर केवळ एक विषय म्हणून पर्यावरणावर लक्ष केंद्रित न करता पाठ्यपुस्तकातील इतर घटकाशी सहसंबंध जोडून कृतियुक्त ज्ञानरचनावादी पद्धतीने पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात येत आहे.  

शिक्षकांसाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षणे ज्यामध्ये शिक्षकांसाठी पाठ्यपुस्तक सलग्न शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारणे सोयीचे होईल. योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वानुसार, स्थानिक पर्यावरणाशी निगडीत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आखणे आणि राबविणे यावर भर असणार आहे. विद्यार्थ्यामध्ये पर्यावरण विषयक गुंतागुतीच्या प्रक्रिया समजून घेऊन त्यावर पर्यावरण संवर्धन कृती करण्या सोबतच नेतृत्वगुण, संवादकौशल्य अशा क्षमता विकसित करणे अपेक्षित आहे. सदर शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून राबविलेल्या कृती उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणविषयक उपक्रमांचा विचार करून स्वानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मुल्यांकन या निर्देशका नुसार केले जाईल.

योजनेची राज्य सनियंत्रण संस्था म्हणून, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय भारत सरकार (MoEFCC) मार्फत नियुक्त आणि स्थापित सेंटर ऑफ एक्सलन्स (Centre of Excellence (CoE) असलेले, पर्यावरण शिक्षण केंद्र, (Centre for Environment Education- CEE) पुणे यांना योजना राबविण्यात जबाबदारी देण्यात आली आहे.योजनेची उद्दिष्टे:

  • स्थानिक पर्यावरणाशी निगडीत समस्या विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष सहभाग व कृती समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यास प्रोत्साहन देणे.
  • निसर्ग व मानव यांच्यातील नातेसंबंध समजून घेऊन ते जोपासण्याचे महत्व बालवयातच बिंबविणे,
  • पर्यावरण विषयक कृती, प्रतिनिधीत्व व संवादकौशल्य या बाबी विकसितकरणे, शाश्वत विकासासाठी
  • आवश्यक आचार-विचारांचे आदान-प्रदान, जडणघडण करणे व त्याद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी नेतृत्वगुण विकसित करणे.
  • स्थानिक-पातळीवर नैसर्गिक संसाधनाच्या व्यवस्थापनाबाबत, स्थानिक लोकांच्या सहभागाने प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवणे.
शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरण आणि हवामान बदल परिणाम कमी करण्याच्या उपाययोजना करण्याच्या दिशेने हे सूचके पर्यावरण विषय केवळ शाळेतील विषय किंवा अभ्यासक्रमाचे शिक्षण म्हणून नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी कृतीची प्रभावी अंमलबजावणी म्हणूनही केंद्रित आहे. शाळांच्या माध्यमातून व विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणविषयक उपक्रमांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल.

शाळा निवडीचे निकष-
१) शाळा ही शासन मान्य असावी.
२) शाळा स्वयंप्रेरणेने (ऑनलाईन नोंदणी) प्रक्रिया करून आपला सहभाग नोंदवतील.
३) योजनेतंर्गत राबवायाच्या उपक्रमांसाठी शाळेच्या नियमित वेळापत्रका व्यतिरिक्त आठवडयाचे तीन तास निसर्गाच्या सानिध्यात प्रत्यक्ष सहभागातून उपक्रम राबविणे अपेक्षित आहे.
४) योजना प्रमुख शिक्षकांची निवड करून शाळा नोंदणी प्रक्रिया करून वेळोवेळी प्रशिक्षणास ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने उपस्थिती नोंदविणे, योजना प्रमुख शिक्षक/ शिक्षिका शाळा व समुदाय पातळीवर योजनेबाबत समन्वय, नियोजन व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असेल.
५) शाळा स्तरावर (५० विद्यार्थ्यांचे ESS शाळा युनिट- विद्यार्थी/विद्यार्थिनी सम समान प्रमाण निवड करणे व एक विद्यार्थी व एक विद्यार्थ्यांनी गट प्रमुख निवड करावी) 
६) विषयनिहाय निकषाच्या आधारे कृती कार्यक्रम, शिबिरे घेणे व समुदाय पातळीवर सभा आयोजित करणे.
७) शाळेत राष्ट्रीय हरित सेना कार्यरत असल्यास, पर्यावरण सेवा योजना आणि राष्ट्रीय हरित सेनेचे गट, शिक्षक व योजनेचे उपक्रम वेगवेगळे राहतील याची दक्षता घेणे.

पर्यावरण सेवा योजना शाळा आणि समुदाय स्तरावर राबवयाच्या संभाव्य उपक्रम बाबत तपशील व यादी-ESS गटांनी जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या अनुषंगाने आवश्यक असे, पाणी, घनकचरा व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन, उर्जा संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणपूरक जीवनशैली, संस्कृती आणि वारसा संबधी कृती उपक्रम राबविता येतील. 

पाणी- 
1. दैनंदिन पाणी वापर मोजमाप 
2. पाणी गळती मोजमाप (ऑडिट) 
3. पावसाचे पाणी मोजमाप 
4. भूजल पुनर्भरण करणे. 
5. सांडपाणी व्यवस्थापन पुनर्वापर आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठी वनस्पतीचा वापर करणे (Root Zone Technology) 
6. घरातील सांडपाणी अथवा स्वयंपाक घरातील पाण्याचा सद्यस्थिती अभ्यास व त्याचा पुनर्वापर (परसबागेतील अभ्यास ) 
7. हरित शाळा व शाळेतील पाणी व स्वच्छतेबद्दल सुधारणा इकोव्हिलेज / इकोसिटी 

घनकचरा- 
1. कचऱ्याचे प्रकार 
2. कचऱ्याचे प्रकार व वर्गवारी करणे. 
3. घरातील कचऱ्याचे ऑडीट 
4. कंपोस्ट खड्डा तयार करणे 
5. जैविक खत निर्मिती व वापर 
6. कुजणाऱ्या कचऱ्यापासून खत निर्मिती 
7. इकोसॅन (इकॉलॉजिकल सॅनिटेशन) 
8. प्लास्टिक मुक्त शाळा ( कापडी पिशवी वापर प्रचार प्रसार)

जैवविविधता:
1. झाडांचे ऋतू अभ्यास करणे
2. स्थानिक झाडांच्या बिंयापासून रोपनिर्मिती व वृक्षारोपण
3. मातीवपाणीयांचेसंवर्धनवउपाययोजना
4. घर तेथे झाड संकल्पना
5. प्रत्येक विद्यार्थी रोपे विकसित करून आपल्या घरी त्याचे संगोपन करतील
6. परसबाग निर्मिती
7. सेंद्रिय शेती संकल्पना
8. घर तेथे झाड, वनराई, तिवरांची वने अभ्यास व संवर्धन
9. आपली परिसंस्थेचा / अधिवास अभ्यास ( जंगल, नदी, तलाव, गवताळ )
10. रस्त्याच्या लगत हरितपट्टा विकसित करणे, स्मृती वने, औषधी वनस्पती उद्यान इ. 

ऊर्जा:
1. विद्युत उपकरण वापरात नसताना बंद करणे
2. विद्युत मीटर व वीज बिल अभ्यास
3. घराचे ऊर्जा लेखा परीक्षण
4. ऊर्जा कार्यक्षम साधने आणि उपकरणे 
5. बायोगॅसचा वापर 
6. अपारंपरिक उर्जा स्त्रोत - सौर उर्जा व पावन उर्जा 

संस्कृती आणि वारसा:
1. पर्यावरणपूरक सण सभारंभ साजरे करणे.
2. पारंपारिक पर्यावरणपूरक वापर व पद्धती
3. सांस्कृतिक पर्यावरण पद्धती जोपासणे. 
4. स्थानिक पारंपारिक ज्ञान व वारसा अभ्यास व संवर्धन जागतिक तापमान वाढ 

हवामान बदल: (सर्व विषय अंतर्गत जनजागृती मोहीम) 
1. प्रदूषण :वायू प्रदूषण, हवामान बदल, पाणी आणि कचरा व्यवस्थापन, ऊर्जा संवर्धन इत्यादी विषयांवर जनजागृती मोहिमा राबविणे.
2. पाणी संवर्धनाचे महत्व याबाबत शिक्षित करणे.
3. जैवविविधताः वन्यजीव संरक्षण, रानभाजी महोस्तव आयोजन संवादात्मक सत्रे,चित्रकला स्पर्धा इ. स्पर्धांचे आयोजन करणे.
4. ऊर्जा: ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करणे,
5. घनकचरा व्यवस्थापन: प्लास्टिक पिशावीस पर्याय कागदी व कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहनदेणे.
6. वायू प्रदूषण अभ्यास
7. ध्वनी प्रदूषण

अभ्यासपर्यावरणपूरक जीवन शैली व पर्यावरण दिन विशेष :  

1. स्थानिक संसाधने जसे, माती, पाणी जैवविविधता, आणि ऊर्जा यांच्या सद्यःस्थितीचा अभ्यास करून त्याचे संवर्धन करणे
2. पर्यावरण दिवस आणि स्पर्धा: पर्यावरण दिन आणि पर्यावरण दिवसकरिता विविध स्थानिक विशिष्ट पर्यावरणीय समस्यांवर विविध स्पर्धाचे आयोजन करणे. 3. वन्यजीव साप्ताह , जागतिक पर्यावरण दिन जनजागृती
4. लोकसहभागातून पर्यावरण संवर्धन व उपाययोजना घरगुती व गावपातळीवर करणे.
5. स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर विभाग शालेय सहभागातून विद्यार्थी आणि समुदायांना सहभागी करून संवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी करणे.